Saturday, April 4, 2015

होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध : एका पालकाचे मनोगत

होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध : एका पालकाचे मनोगत

2015 च्या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत (इ. 6 वी) चि. मुक्ता परांजपे हिने सुवर्ण-पदक मिळविले. त्यासाठी वर्षभर चाललेल्या प्रक्रियेचा हा धावता आढावा तिच्या वडीलांच्या शब्दांत - भावी काळात परीक्षा देणाऱ्यांना मदत होईल या हेतूने दिला आहे.


परीक्षेविषयी


मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन (MSTA) अर्थात मुंबई विज्ञान शिक्षक संघटना या संस्थेमार्फत इ. 6 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही परीक्षा घेतली जाते. मुंबई, ठाणे/रायगड व उर्वरित महाराष्ट्र या तीन विभागांत मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्रपणे ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेचे लेखी परीक्षा (बहुपर्यायी प्रश्न), प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प असे चार टप्पे असतात. लेखी परीक्षा सप्टेंबर महिन्यात होते तर प्रकल्प फेब्रुवारी महिन्यात करायचा असतो. सुमारे पाच महिने चालणारी अशी विस्तृत प्रक्रिया असणारी ही भारतातील बहुदा एकमेव परीक्षा आहे. महाराष्ट्रातून सुमारे 45000 विद्यार्थी या परीक्षेला बसतात.


लेखी परीक्षेला बसणाऱ्या एकुण विद्यार्थ्यांपैकी 7.5 प्रतिशत विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरतात. प्रात्यक्षिक परीक्षेला बसणाऱ्या एकुण विद्यार्थ्यांपैकी 10 प्रतिशत विद्यार्थी प्रकल्पफेरीसाठी पात्र ठरतात. प्रकल्पफेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर प्रकल्प करायचा असतो. शेवटच्या मुलाखत फेरीमध्ये प्रकल्प-मुलाखत व सामान्य-मुलाखत अशा दोन मुलाखती होतात. चारही टप्प्यांमधील कामगिरीनुसार प्रकल्पफेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10 प्रतिशत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर उर्वरित विद्यार्थ्यांना रजत व कांस्य पदके दिली जातात.


विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जाणीवा समृध्द होण्यासाठी तसेच त्यांना वैज्ञानिक प्रक्रियांची ओळख होण्यासाठी ही परीक्षा अतिशय उपयुक्त आहे. www.msta.in या संकेतस्थळावर या परीक्षेची अधिक माहिती उपलब्ध आहे.


लेखी परीक्षेची पूर्वतयारी


होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सहभागी होण्याच्या निर्णयापासूनचा सुवर्ण-पदक मिळाल्याची घोषणा होईपर्यंतचा प्रवास संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत रोमहर्षक होता. मुक्ताने ही परीक्षा द्यायची असा निश्चय ती पाचवीमध्ये असल्यापासूनच केला होता. त्यामुळे पाचवीच्या परीक्षेनंतरच्या सुटीच्या काळातच लेखी परीक्षेचा अभ्यास सुरु केला.


लेखी परीक्षेसाठी प्रामुख्याने दोन अभ्याससाधनांचा वापर केला.


· मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन (MSTA) ने मेनका प्रकाशनाच्या सहकार्याने छापलेले परीक्षेचे अधिकृत अभ्यासपुस्तक.


· या लेखाच्या लेखकाने तयार केलेल्या MahaEduTechNet’s MindMaps for Homi Bhabha BalVaidnyanik Exam STD 6 या नोटस्


या नोटस विषयी थोडे अधिक सांगणे वावगे ठरणार नाही.


  • या नोटस् माईंडमॅप्सच्या स्वरुपात आहेत. माईंडमॅपमध्ये विभाग/उपविभागांमध्ये विभागलेली माहिती चित्रमय स्वरुपात दर्शविली जाते. अशाप्रकारे दर्शविलेले आकृतीबंध मेंदूमध्ये अधिक चांगल्या रितीने साठविले जाऊ शकतात.
  • महाएज्युटेकनेट 'होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेसाठी माईंडमॅप्स' मागील संकल्पना - परीक्षेच्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर माईंडमॅप्स आधारलेले आहेत. गेल्या काही वर्षांतील या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास व विश्लेषण करुन हे माईंडमॅप्स बनविलले आहेत. इ. 4, 5, 6 या इयत्तांच्या SSC board तसेच CBSE board यांच्या अभ्यासक्रमावर हे माईंडमॅप्स आधारलेले आहेत. अभ्यासाच्या सुलभतेसाठी घटकांची विभागणी Physics, Chemistry, Biology, Geography-Environment अशा चार विभागांमध्ये केलेली आहे.


अभ्यास करताना प्रत्येक घटकाला अनुलक्षुन त्या घटकाभोवतीचे अनेक घटक चर्चेत घेतले. परीक्षा 6 वी ची असली तरी परीक्षेची उच्च पातळी लक्षात घेता 9 वी, 10 वी ची विज्ञानाची पाठयपुस्तके सढळपणे वापरली. Details पाठ न करता Concepts समजतील हे पाहिले. मुख्य म्हणजे अभ्यासाचे ओझे वाटणार नाही याची काळजी घतली. अभ्यास मजेमजेत होईल हे पाहिले.


अधिकृत अभ्यासपुस्तकात दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोडविल्या. 2011 नंतरच्या प्रश्नपत्रिका तुलनेने अधिक सोप्या होत्या (अभ्यासक्रमातील बदलामुळे 2011 च्या आधीच्या प्रश्नपत्रिका काही प्रमाणात वेगळया आहेत).


लेखी परीक्षेमध्ये मुक्ताला 100 पैकी 76 गुण मिळाले. लेखी परीक्षेत ती तिच्या विभागात (ठाणे/रायगड विभाग-मराठी माध्यम) सर्वाधिक गुणांसह पुढच्या फेरीत पोहोचली. हे गुण प्रात्यक्षिक फेरी पार करताना मोलाचे ठरले. या 100 गुणांचे 30 गुणांत रुपांतर करुन (100 पैकी 76, 30 पैकी 22.8) ते गुण पुढे Carry forward केले जातात.


प्रात्यक्षिक परीक्षेचा अभ्यास


नागोठण्यासारख्या निमशहरी भागात रहात असल्याने प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करुन घेणारा कोणताही क्लास परीसरामध्ये उपलब्ध नव्हता. शिवाय प्रात्यक्षिक परीक्षेला निवडली गेलेली मुक्ता ही गावातील एकमेव मुलगी होती. त्यामुळे हा प्रवास 'एकला चलो रे' असाच होणार होता.


गतवर्षी ही परीक्षा दिलेल्या एका स्नेह्याच्या मुलाने प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करुन घेणारा क्लास ठाण्यात लावला होता. त्याची नोंदवही मिळवून त्यावरुन प्रात्यक्षिकांचा अंदाज घेतला. डोंबिवली येथील चैतन्य वझे यांचे Practical Kit देखील मागविले होते. याखेरीज Ebay संकेतस्थळावरुन VERNIER CALIPER, SCREW GUAGE, PH PAPERS, CONVEX LENS, CONCAVE LENS, LENS STAND, SMALL PLANE MIRROR, PLANE MIRROR STAND, BAR MAGNETS, MAGNETIC COMPASS, SPRING BALANCE, GLASS TRAINGULAR PRISM ही सामग्री असणारे किट मागविले होते.


विलेपार्ले येथील कुतुहल या संस्थेने एक दिवसाचे Practical Workshop आयोजित केले होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मुक्ताला नेले होते. या Workshop संबंधीची आठवण म्हणजे मराठी माध्यमातून 6 वी साठी सहभागी होणारी मुक्ता ही एकमेव मुलगी होती. तिच्यासोबत रेग्युलर बॅचचे दोघे विद्यार्थी होते. असे असूनही संयोजक शिक्षकांनी अतिशय आत्मियतेने Workshop पूर्ण केला. या अनुभवाचा मुक्ताला बराच फायदा झाला.


या सर्व साधनांचा वापर करुन खालील प्रयोग आम्ही घरच्या घरी केले.


1. लिटमस, मेथिल ऑरेंज, हळद इ. दर्शकांचा वापर करुन आम्ल/आम्लारी ओळखणे


2. विविध द्रवांच्या pH चे मापन.


3. आम्ल व कार्बोनेटची अभिक्रिया


4. कॉपर सल्फेट व लोखंड यांची अभिक्रिया


5. संप्लवनशील पदार्थांचा अभ्यास


6. द्रवात बुडवून अनियमित आकाराच्या वस्तूचे घनफळ


7. आर्किमिडीजचे तत्व


8. दोलकाचा आंदोलनकाल मोजणे


9. अनियमित क्षेत्रफळाचे आलेखाच्या मदतीने मापन


10. बहिर्वक्र भिंगाच्या प्रतिमा


11. दोन आरशांच्या मदतीने (आरशांमधील कोन बदलून) प्रतिमा


12. प्रिझमचा वापर करुन प्रकाशाचे सात रंगांमध्ये विभाजन


13. व्हर्निअर कॅलिपर व स्क्रूगेजचे लीस्ट काउंट मोजणे


14. चुंबकाचे आकर्षण/प्रतिकर्षण


15. वनस्पतींच्या विविध भागांचे निरीक्षण (पाने, खोडे, मुळे, फुले, फळे)


16. प्राण्यांचे वर्गीकरण (पृष्ठवंशीय/अपृष्ठवंशीय, मासे/उभयचर/सरपटणारे/पक्षी/सस्तन, exo-skeleton/endo-skeleton, अंडी घालणारे/पिलांना जन्म देणारे इ.)


17. मानवी शरीरातील विविध संस्थांचा अभ्यास (Google 3D Images)


प्रात्यक्षिक परीक्षेत गतवर्षीपर्यंत अर्ध्या तासामध्ये 10 प्रयोग करायचे असत. या वर्षी प्रयोगांची संख्या 10 वरुन 5 वर आणण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाला 6 मिनीटे एवढा वेळ मिळाला. प्रयोग करीत असताना परीक्षक कोणत्याही प्रकारे परीक्षण करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांने मांडलेली निरीक्षणे, गणने आणि निष्कर्ष यांनाच सगळे गुण असतात.


मुक्ताला या फेरीत 30 पैकी 12.5 गुण मिळाले. लेखी व प्रात्यक्षिक फेरी मिळून 60 पैकी 35.3 गुण मिळवून ती पुढील फेरीत गेली. ही काहीशी Narrow escape होती. प्रात्यक्षिक फेरीची तयारी थोडी कमी पडली असे वाटले. विशेषत: खालील मुद्दयांकडे कमी लक्ष दिले गेले.


1. निरीक्षणे, गणने व निष्कर्ष यांची योग्य मांडणी


2. वेळेत प्रयोग पूर्ण होतो का ते तपासणे


3. प्रयोगशाळेतील वातावरणात आत्मविश्वासाने वावरायचा सराव


4. प्रयोग करण्याइतकेच निरीक्षणे मांडणे याला असणारे महत्व


प्रकल्प फेरी


प्रात्यक्षिक फेरी चालू असताना पालकांसाठी प्रकल्पफेरीसाठी एक मार्गदर्शन सत्र घेतले जाते. या मार्गदर्शन सत्रात मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन (MSTA) च्या तज्ज्ञांनी खालील गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या.


1. पालकांनी प्रकल्प करण्यात कितीही मदत केली, तरी, खरे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या मुलाखतीमध्ये होत असते. त्यामुळे, प्रकल्पातील प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांने स्वत: केलेली असणे, त्याला ती पूर्णपणे समजलेली असणे अतिशय गरजेचे आहे.


2. प्रकल्पाचा विषय Common असू नये, नाहीतर, एकाच विषयावर अनेक प्रकल्प होतील. विषय Exclusive असेल तेवढा चांगला.


या वर्षी इ. 6 वी साठी ''माझया परिसराचा निसर्गअभ्यास'' ही Theme होती. मुक्ताशी चर्चा करुन आम्ही जलस्रोतांचा अभ्यास हा विषय निश्चित केला. सर्वप्रथम 'अंबा नदीच्या प्रवाहाचा अभ्यास' करायचे ठरविले होते. मात्र उपलब्ध कालमर्यादेमध्ये असा अभ्यास करणे शक्य नसल्याचे दिसून आले. तेव्हा 'नागोठणे परिसरातील जलस्रोतांचा अभ्यास' या विषय अखेरीस घेतला.


प्रकल्पनिर्मितीचा कालखंड संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय आव्हानात्मक, तितकाच आनंदाचा असतो. आपल्या इतर सर्व Priorities तेवढा काळ बाजूला सारुन आईवडीलांनी विद्यार्थ्याला मदत केली तर दिलेल्या कालमर्यादेत प्रकल्प सहज पूर्ण होतो. प्रकल्प पूर्णपणे विद्यार्थ्याने स्वत:च्या हस्ताक्षरात लिहायचा असतो. प्रकल्पाची पाने सुमारे 50 ते 60 असतात. पण त्यासाठी काही नियम नाही. अहवालामधील Content जास्त महत्वाचा असतो. 30 पानी प्रकल्प-अहवाल असलेल्या विद्यार्थ्यालाही सुवर्ण पदक मिळू शकते, 90 पानी प्रकल्प-अहवाल असलेल्या विद्यार्थ्यालाही सुवर्ण पदक मिळू शकते.


प्रकल्प करताना प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थी स्वत: सहभागी असणे गरजेचे आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट त्याने स्वत: केली पाहिजे. अतिउत्साहाच्या भरात पालकांनी कृती करुन टाकल्या तर ते अंतिमत: मारक ठरते. प्रकल्पातील प्रत्येक घटकावर विद्यार्थ्याला अस्खलीतपणे बोलता आले पाहिजे. नुसती पोपटपंची कामाची नाही. घटकाच्या आजुबाजुच्या अनेक संकल्पना माहित असायला हव्यात. त्यामुळे प्रकल्प उगीच HiFi करु नये. विद्यार्थ्याला Assimilate करता येईल इतपतच विषयाची खोली असावी.


मुक्ताने केलेल्या प्रकल्पाचा साधारण आराखडा


पाणी हा कोणत्याही परिसंस्थेसाठी अतिशय महत्वाचा व अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे परिसंस्थेतील या अजैविक घटकाचा अभ्यास करण्याचे ठरविले.

सर्वप्रथम परिसरातील जलस्रोतांची यादी केली. त्यात पुढील स्रोतांची नोंद केली

· नागोठण्याजवळून वाहणारी अंबा नदी

· विविध तलाव (5), विहिरी (सुमारे 20)

· पर्जन्य व हवेतील आर्द्रता

· वनस्पतींचे बाष्पोत्सर्जन

· सांडपाणी

सांडपाणी हा पाण्याचा उपयुक्त स्रोत नसला तरी त्याचा परिसंस्थेवर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक वाटले.

क्षेत्रभेटी - प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून पुढील जलस्रोतांना भेटी दिल्या.

· अंबा नदी (खाऱ्या पाण्याचा भाग व केटी बंधाऱ्याच्या अलिकडील गोडया पाण्याचा भाग)

· तलाव (5)

· नागोठण्यात सुमारे 20 विहिरी आहेत, त्यापैकी प्रातिनिधिक 4 विहिरींना भेट दिली

· MIDC जलशुध्दीकरण प्रकल्प,

· वाकण येथील केंद्रीय जल आयोग कार्यालय

सर्व ठिकाणचे पाण्याचे नमुने बाटल्यांमध्ये गोळा केले. प्रत्येक ठिकाणच्या वनस्पती व पक्ष्यांची नोंद केली. पक्षीनिरीक्षणासाठी जलस्रोतांना परत भेटी दिल्या.

मुलाखती - विषयाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी खालील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या.

· श्री. संतोष जाधव - प्लँट ऑपरेटर - MIDC जलशुध्दीकरण प्रकल्प

· श्री. खंडागळे - वाकण येथील केंद्रीय जल आयोग कार्यालय

· श्री. अमीत पवार व श्री. मनोज कोळी - नदी व तलाव येथील माशांविषयी माहिती

· श्री. जयराम पवार - जलस्रोतांची भूतकालीन स्थिती

· प्रा. डॉ. जाधवार सर - अंबा नदीतील प्रदूषणाविषयी माहिती

· श्री. अनील गीते - संचालक - श्रीकृष्ण पॅथेलॉजिकल लॅबोरेटरी यांनी सुक्ष्मदर्शकाच्या स्लाईडस् तयार करणे व सुक्ष्मदर्शकाचा योग्य वापर करणे याविषयी मार्गदर्शन केले.

या मुलाखतींमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग प्रकल्पातील विविध विभागांमध्ये केला.

प्रयोग - जलस्रोतांचा अधिक अभ्यास करण्यासाठी पुढील प्रयोग केले.

· सुपिकता तपासणी प्रयोग - विविध जलस्रोतांनजीकची माती व तेथील पाणी यांत वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास

· विकीमॅपियाच्या मदतीने तलावक्षेत्राचे मापन - उपग्रहीय नकाशे वापरुन पाचही तलावांच्या क्षेत्रफळाचे मोजमाप

· विविध जलनमुन्यांची TDS मोजणी, पाण्याचा रंग व गढुळपणा तपासणी, विविध जलनमुन्यांची सुफेनता तपासणी, विविध जलनमुन्यांची pH मोजणी.

· वनस्पतींचे बाष्पोत्सर्जन प्रयोग

· पाण्याच्या नमुन्यांचा सुक्ष्मदर्शकाखाली अभ्यास

या प्रयोगांच्या निरीक्षणांची नोंद केली व त्यावरुन निष्कर्ष काढले.

वनस्पती निरीक्षण - जलस्रोतांनजीक असणाऱ्या पुढील वृक्षांची नोंद केली.

· नदीकाठी - उंबर (औदुंबर), गुलमोहोर, पळस, भेंडी, विलायती शिरीष, साग

· तलावाकाठी - आंबा, उंबर (औदुंबर), कमळ, करंज, काशिद, गुलमोहोर, पळस, पांढरा चाफा, पिंपळ, बिट्टी, वड, विलायती शिरीष, साग

या वृक्षांची माहिती इंटरनेटच्या मदतीने मिळविली

पक्षी निरीक्षण - जलस्रोतांनजीक असणाऱ्या पुढील पक्ष्यांची नोंद केली.

· नदीकाठी - ढोकरी, छोटा बगळा, छोटा कवडया खंडया, लाल गाठीची टिटवी, छोटा पाणपोपट, पांढऱ्या चोचीचा खंडया, डोमकावळा, देवकन्हई

· तळयाकाठी - चिमणी, कावळा, साळुंखी, बगळे

यातील देवकन्हई हा पक्षी परदेशी पाहुणा आहे, तर बाकीचे स्थानिक पक्षी आहेत. पक्ष्यांची माहिती पक्षीकोश व इतर पुस्तकांतून मिळविली व नोंद केली.

संदर्भशोध - प्रकल्पाशी संबंधित माहिती शोधण्यासाठी खालील संदर्भसाधनांचा वापर केला.

· पुस्तके

· इंटरनेट

· तज्ज्ञ व्यक्ती


मुलाखतफेरी


परळ येथील सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल या शाळेमध्ये मुलाखतफेरी पार पडली. मुलाखती दोन होतात. एक मुलाखत प्रकल्पावर आधारित असते, तर, दुसरी, विज्ञानावर सामान्य मुलाखत असते. प्रत्येक पॅनेलमध्ये 3 ते 4 तज्ज्ञ असतात. मुलाखत अतिशय अनौपचारिक वातावरणात, विद्यार्थ्यांना कोणताही ताण येणार नाही अशाप्रकारे घेतली जाते. एखादे उत्तर चुकले, तर ते दुरुस्त करायची संधी दिली जाते. मुलाखतीचा पॅटर्न ठरलेला नसतो. प्रकल्पावर आधारित मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याने प्रकल्पाविषयी माहिती द्यायची असते. या सर्व प्रकल्पाचा सारांश थोडक्यात सांगायचा असतो. नंतर परीक्षक त्या अनुषंगाने प्रश्न विचारतात. विशेषत: विद्यार्थ्याने केलेल्या कृतीवर अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. सामान्य मुलाखतीमध्ये कुठून आलास, काय खाल्लस अशा सामान्य प्रश्नांपासून सुरुवात करुन नंतर विज्ञानातील प्रश्न विचारले जाऊ शकतात. विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचा घटक विचारुन त्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात.


प्रत्येक मुलाखत 30 गुणांची असते. मगाच्या दोन फेऱ्यांतील 60 गुण व मुलाखतींचे 60 गुण अशा 120 गुणांपैकी सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण तर इतरांना रौप्य व कांस्य पदके दिली जातात. 2015 या वर्षी 6 वीच्या सुमारे 20 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देण्यात आली.




3 comments:

  1. छान. खरच आभारी आहे.

    ReplyDelete
  2. Khup Chhan mahitichi sathavan karun thevlit tumhi. Manapsun tumacha aabhari aahe.

    ReplyDelete
  3. Chhan!!! Congratulations!!! 9th std chyahi gold medalist Chi mahiti dya

    ReplyDelete